सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथे गुरूवार दि.१३ च्या मध्यरात्री स्वतःच्या घरात खाटेवर झोपलेल्या २० वर्षीय तरुणीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून रहस्यमय हत्या झाली. या हत्येमागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा अंदाज पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात काढला आहे. हत्या करणारा आरोप नेमका कोण, याचाही अंदाज पोलिसांना आला असून पुढील दोन-तीन दिवसात या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
घराच्या आवारात मृत युवतीची आई आणि भाऊ झोपलेले असताना घरातील खोलीत झालेल्या या खुनाचा थांगपत्ता त्यांना तात्रभर लागला नव्हता. धुंदीत ते गाढ झोपलेले होते. याचाच फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून ओलिता रामय्या सोयाम (२० वर्ष) हिच्या गळ्यावर धारदार शस्त्र चालवून झोपेतच तिचा जीव घेतला. त्यानंतर घराच्या मागील दाराने पळ काढला.
सदर युवती बारावीपर्यंत शिकलेली आहे. ती कामावर सुद्धा जात होती. त्यामुळे बाहेरील काही व्यक्ती तिच्या संपर्कात आल्या. ओलिताकडील मोबाईलच्या डेटावरून पोलिसांनी संबंधितांची चौकशी केली. त्यावरून या हत्येमागे प्रेम प्रकरणाचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान लवकरच आरोपीला जेरबंद करण्यासोबत या खुनाचे रहस्य उलगडेल, असा विश्वास सिरोंचा ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केला.