गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी शानदार विजय मिळवत भाजपच्या यशाचा झेंडा फडकवला. या विजयामागे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांचे नेतृत्व आणि बंगाली समाजाचे अमुल्य सहकार्य निर्णायक ठरले. ‘बंगाली समाजाच्या योगदानामुळे हा विजय अधिक सुकर झाला, बंगाली समाजाचे प्रश्न व समाजाच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी प्रतिक्रिया मा.खा. नेते यांनी अभिनंदन स्वीकारताना व्यक्त केली.
नेते यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालयात बंगाली समाजाच्या वतीने नेते यांचे बंगाली आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आकोली विश्वास यांच्यासह सरपंच महिला व बंगाली समाजाचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
गडचिरोलीतील विजय हा भाजपची संघटनशक्ती, नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. या विजयाने पक्षाला नव्या उंचीवर नेले असून कार्यकर्त्यांना अधिक आत्मविश्वास दिला आहे. हा विजय भाजप आणि जनतेच्या विश्वासाला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी खा.नेते यांनी जनतेचे व भाजपा महायुतीतील पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशोक नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये सभा घेत भाजपचा प्रचार केला. यामुळे बंगाली समाजाचा भाजप उमेदवार डॅा.नरोटे यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुलभ झाल्याचे दिसून येते.