गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक डीएसआर नगर भवन येथे झाली. भाजप महायुतीचे गडचिरोली मतदार संघातील उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी या बैठकीत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीचा समारोप भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाने झाला.
अशोक नेते यांनी भाजपच्या आगामी धोरणांवर सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक कार्यकर्ता, बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी पक्षाची भूमिका स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य द्यावे. जनतेच्या प्रश्नांवर संवाद साधून पक्षाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी नेते यांनी डॉ.मिलिंद नरोटे यांचे विधानसभेतील नेतृत्व गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कसे महत्वाचे आहे, हे स्पष्ट केले. डॉ.नरोटे यांच्या सामाजिक दृष्टिकोनाने गडचिरोली मतदार संघात विकासाची नवी उंची गाठता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक भूमिकेचा अभ्यास, प्रचार मोहिमांची आखणी आणि आधुनिक साधनांचा वापर याबद्दल चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीतील त्यांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आणि डॉ.नरोटे यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यात आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते गजानन येनगंधलवार, सुधाकरराव येनगंधलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, शहर महामंत्री केशव निंबोड, ज्येष्ठ नेते प्रशांत भुगुवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.