मुंबई : अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला अजित पवार यांनी संबोधित केलं. तसंच पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 10 जिल्ह्यांमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा दिला. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी ७ रुपयांचे अनुदान देऊ केले, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.