गृहमंत्री अमित शाह यांचा ९ डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा पुन्हा रद्द

नवीन तारीख देणार, खा.नेते यांची माहिती

गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचा येत्या ९ डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा व प्रस्तावित कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. शाह यांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम ठरविले जातील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून दिली.

काही महत्वपूर्ण कामांमुळे शाह यांना गडचिरोली दौरा पुढे ढकलावा लागल्याचे खा.नेते म्हणाले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचे व प्रकल्पाचे भूमिपुजन, कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन, तसेच वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाचे भूमिपुजन, चिचडोह बॅरेजचे लोकार्पण अमित शाह यांच्या हस्ते होणार होते. हे सर्व कार्यक्रम नंतर होतील, असे खासदारांनी कळविले.

यापूर्वी १८ नोव्हेंबरला शाह यांचा गडचिरोली दौरा होणार होता. परंतू तो अंतिमत: निश्चित होण्याआधीच रद्द झाला होता. आता दुसऱ्यांदाच त्यांनी तारीख बदलविली आहे. मात्र पुढील कोणती तारीख निश्चित केली जाते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.