Home दैनंदिन बातम्या बस अपघातातील 38 प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर, 7 जण भरती

बस अपघातातील 38 प्रवाशांची प्रकृती धोक्याबाहेर, 7 जण भरती

किरकोळ जखमी 31 प्रवाशांना सुटी

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळील पोटफोडी नदीवरील पुलाच्या उंचवट्यावरून एसटी बस खालच्या खोलगट भागात उलटून झालेल्या अपघातात 38 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 7 जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 31 किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा अपघात काल (शुक्रवारी) दुपारी घडला. (खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, सदर बस गडचिरोलीवरून शिवणीमार्गे पोटेगावकडे जात होती. दरम्यान बस पोटफोडी नदीवर अलिकडेच उभारण्यात आलेल्या नवीन पुलावर चढताच बसचे स्टेअरिंग लॅाक झाले आणि काही कळायच्या आतच बस अनियंत्रित होऊन खोलगट भागात कोसळून उलटली. (खाली वाचा)

अपघाताची माहिती मिळताच सामान्य रुग्णालय प्रशासनाने तातडीने वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित केली. रुग्णवाहिका सेवांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त प्रवाशांना विलंब न करता रुग्णालयात आणले. रुग्णालयात दाखल होताच दुखापतीच्या स्वरूपानुसार आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय व्यवस्थापन करण्यात आले.

रुग्णालयातील आपत्कालीन यंत्रणा तातडीने सज्ज

नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. अतिदक्षता विभागासह आवश्यक उपचार विभागांमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका कार्यालयातील परिचर्या संवर्ग, कक्षसेवक तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांना तात्काळ उपस्थित राहून जखमी प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपघातातील रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णालयातील उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य पद्धतीने वापर करून रुग्णांची तपासणी, उपचार, निरीक्षण व आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली.

सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा समन्वय

या आपत्कालीन परिस्थितीत सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यकतेनुसार रुग्णांची तपासणी करून उपचार व्यवस्थेत सहभाग घेतला.

आ.डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडून रुग्णांची पाहणी

दरम्यान गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच स्वतः रुग्णांची तपासणी करून उपचार व्यवस्थेची पाहणी केली.

सहपालकमंत्र्यांनी दिल्या सूचना

बस अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांच्याकडून जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची माहिती घेतली. जखमींवर योग्य उपचार करून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून जखमींवर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत.