लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी घ्या- डॅा.होळी

नवेगाव व पारडीत लाभार्थ्यांसाठी शिबिर

गडचिरोली : नवेगाव व पारडी येथे मुख्यमंत्री माझीं लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचा आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र भगिनीला मिळावा, या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन डॉ.होळी यांनी याप्रसंगी केले.

यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले, माजी सभापती मारोतराव इचोडकर, सरपंच संजय निखारे, भाजपच्या जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, कीर्तिकुमार मासुळकर, रवींद्र सोळंखी, सुमन गाडगे, सीमा बामणकर तथा माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिकृत केंद्रावरीलच अर्ज ग्राह्य

जिल्ह्यातील काही राजकीय व सामाजिक संघटना शिबिरे आयोजित करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेत आहे. चुकीचा अर्ज भरल्यास अथवा अर्ज शासनाकडे सबमिट न झाल्यास संबंधित पात्र महिला लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्ज पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील, अशा सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पात्र महिलांनी या योजनेसाठी आपले अर्ज शासनाने प्राधिकृत केलेल्या अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र, नगरपालिका / नगरपंचायतीचे मदत केंद्र या अधिकृत केंद्रावरच भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. या योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये, अशा सूचना देतानाच अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.