देसाईगंज : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना देसाईगंज पोलिसांनी पकडून त्यातील जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई मंगळवारी पहाटे देसाईगंज ते जुनी वडसा मार्गावर करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देसाईंगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने मौजा जुनी वडसा रोडवरील पोपटी लॉनजवळ सापळा रचुन पाळत ठेवली. यादरम्यान देसाईगंज ते जुनी वडसा मार्गावर दोन वाहने संशयितरित्या येताना दिसुन आली. त्यामुळे तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवुन तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरली असल्याचे निदर्शनास आले.
वाहन क्रमांक एमएच 40 सी.डी. 8649 या मालवाहू वाहनाचा चालक प्रणय राजेंद्र बुल्ले (21 वर्षे) रा.देऊळगाव, ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर यांच्या ताब्यातील वाहनात 5 बैल (प्रतिबैल विक्री किंमत 20 हजार रुपये), त्याचप्रमाणे वाहन क्रमांक एमएच 36, ए.ए. 0076 बोलेरो पिकअप वाहन, ज्याचा चालक राजेश सोमेश्वर बावनकर (24 वर्षे), रा.वेळवा, ता.पवनी, जि.भंडारा याच्या ताब्यातील वाहनात 7 बैल, प्रतिबैल विक्री किंमत अंदाजे 15 हजार रुपये अशा एकुण दोन्ही चारचाकी वाहनात 12 गोवंशीय जनावरे (एकुण किंमत 2,05,000 रुपये) आणि दोन्ही वाहने (किंमत अंदाजे 13,75,000) असा एकुण 15,80,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील आरोपी सचिन मधुकर बावनथळे (25 वर्ष), रा.येंगलखेडा, ता.कुरखेडा जि.गडचिरोली (बैल मालक) आणि प्रणय राजेंद्र बुल्ले (21 वर्षे) रा.देऊळगाव, ता.ब्राम्हपुरी जि.चंद्रपूर तसेच राजेश सोमेश्वर बावनकर (24 वर्षे), रा.वेळवा, ता.पवनी, जि.भंडारा यांच्यावर देसाईगंज पोलिसांनी कलम 5 (अ), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976, सहकलम 11 (ड) (ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा 1960, सहकलम 3 (5) भान्यासं, सहकलम 119 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय जगताप यांचे नेतृत्वात सहायक फौजदार विनोद बोगा, पोहवा राजु उराडे व पोअंमलदार 8035 अजय दुर्गम यांनी केली आहे.