दंडारीने ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवली- दशमुखे

पोर्ला येथील प्रयोगाला झाली गर्दी

गडचिरोली : दंडारीने ग्रामीण भागातील लोककला जिवंत ठेवली आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने नसल्याने गावातील कलाकार आपली कामे आटोपून दोन-तीन महिने रात्री तालीम करुन दंडारीचे प्रयोग करत असत. आज जरी दंडारीचे प्रयोग कमी होत असले तरी त्यांची जागा नाटकाने घेतली आहे. अशाही परिस्थितीत आज पोर्ला येथे दंडार होत आहे ही बाब अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन पं.स.चे माजी उपसभापती व जिल्हा सचिव विलास केशवराव दशमुखे यांनी केले.

बाल गणेश दुर्गा कला मंडळ पोर्ला यांच्या वतीने संगीतमय ‘दिवा लावला पोरीनं’ या दंडारीचे उद्घाटन विलास दशमुखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नवघडे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच दादाजी साळवे, जीवन निकुरे, परशुराम बांबोळे, बाजार समितीचे संचालक बापू फरांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास आखाडे, भास्कर मेश्राम, रमेश इंगळे, संतोष दशमुखे, डंबाजी कावळे, पंकज येवले, मनोज किरमिरे आदी उपस्थित होते.

दंडार पाहण्यासाठी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती.