गडचिरोली : जिल्ह्यातील चारही डायलिसिस केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, कोणतेही केंद्र बंद नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त महाडायलिसिस प्रकल्पांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील तीन केंद्रांवर 2 ते 22 नोव्हेंबर 2026 या 21 दिवसांच्या कालावधीत एकूण 379 डायलिसिस सेवा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी गावंडे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण चार डायलिसिस केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी एक केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आहे. याशिवाय महाडायलिसिस प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा आणि ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे प्रत्येकी एक केंद्र कार्यरत आहे.
महाडायलिसिस प्रकल्पाच्या पूर्वसूचनेनुसार 2 नोव्हेंबर 2026 रोजी सुमारे एक तास सेवा थांबली होती. मात्र, त्यानंतर सेवा पूर्ववत सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यातील डायलिसिस सेवा सद्यस्थितीत पूर्णतः सुरू असून, कोणत्याही केंद्राची सेवा बंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाडायलिसिस प्रकल्पांतर्गत 2 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे 110, उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे 88 आणि ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे 181 अशा एकूण 379 डायलिसिस सेवा देण्यात आल्या. जिल्ह्यातील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीसह आरमोरी, कुरखेडा आणि चामोर्शी येथील केंद्रांवर नियमित व सुरळीत सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारांबाबत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, तसेच उपचारांची सातत्यपूर्ण उपलब्धता कायम राहावी, यासाठी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व चारही केंद्रांवर रुग्णांना नियमित व सुरळीत डायलिसिस सेवा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
पाच वैद्यकीय अधिकारी नव्याने रुजू
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांबाबत डॉ.गावंडे यांनी सांगितले की, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये पाच वैद्यकीय अधिकारी नव्याने रुजू झाले आहेत. त्यांची नियुक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयासह चामोर्शी, धानोरा आणि वडसा येथील आरोग्य संस्थांमध्ये झाली आहे.
यामध्ये डॉ.मनोज समरित हे आश्रमशाळा पथक क्रमांक 2, जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे 9 नोव्हेंबर रोजी, तर डॉ.मित्तरल गेडाम हे ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे 17 नोव्हेंबर रोजी रुजू झाले आहेत. डॉ.मृणाल कोडापे आणि डॉ.नम्रता मडावी हे ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे 13 नोव्हेंबर रोजी रुजू झाले आहेत. डॉ.हिना उदिरवाडे या ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे 17 नोव्हेंबर 2026 रोजी रुजू झाल्या आहेत.
































