गडचिरोली : भारत सरकारकडून 2025 हे वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेत येत्या 25 एप्रिल रोजी ‘आदिवासी संस्कृती आणि परंपरा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. म्हैसूरच्या अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक व विभाग प्रमुख, तथा गडचिरोली जिल्ह्याचे सूपुत्र डॉ.प्रकाश हलामी यांच्या पुढाकाराने हे व्याख्यान प्रत्यक्ष व आॅनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे.

यात माजी सनदी अधिकारी आणि आदिवासी विकास विभाग नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम सांभाळलेले रवींद्र एच.ठाकरे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ते आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा तसेच त्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांशी परिचित असून प्रशासनातील स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून सेवा देत असताना शासनाच्या अनेक महत्वपूर्ण योजना आदिवासी भागात राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सद्या ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती आयोगाचे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्यामराव कोरेटी यांचेही व्याख्यान होणार आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी ते नेहमी कार्यरत असतात. तसेच आदिवासी भाषा आणि संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांचे संशोधन कार्यसुद्धा आदिवासी समाजाशी संबंधित आहे. ‘मध्य प्रदेशातील गोंड लोकांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास’ या विषयावर त्यांचा प्रबंध आहे. ‘मध्य भारतातील काही आदिवासी उठाव’ या विषयावरसुद्धा त्यांनी संशोधन केले आहे. विषय तज्ज्ञ म्हणून त्यांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय इतरही अनेक वक्ते या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाची लिंक वॉटसअॅप ग्रुपवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनुसूचित जाती-जमाती लायसन्स अधिकारी तसेच म्हैसूरच्या अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे मुख्य वैज्ञानिक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ.प्रकाश एम.हलामी यांनी केले आहे.