Home दैनंदिन बातम्या नीट-जेईईबद्दल मार्गदर्शनासाठी ‘लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट’ कार्यशाळा

नीट-जेईईबद्दल मार्गदर्शनासाठी ‘लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट’ कार्यशाळा

250 आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी आणि ‘लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट’ पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट या निवासी कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले. 20 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील दहावीची परीक्षा दिलेल्या 250 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

प्रकल्प कार्यालय अहेरी येथील शिक्षण विस्तार अधिकारी डी.के. कस्तुरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक राजेश दुर्गे, तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम.के.बल्की, डी.डी.भोंगळे, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ.सुबोध कळमनुरीकर, डॉ.ओमराज पॉल, डॉ.शिवम काळेकर, डॉ.श्रवण वेलादी, डॉ.ओमकार बिलवले आदी उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर भाषणात डी.के.कस्तुरे म्हणाले, समाजातील वंचित, उपेक्षित तसेच आर्थिक व सामाजिक मागासलेल्या वर्गातील विद्यार्थी नीट, जेईई सारखे महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना अगदी मोफत, नि:शुल्क फाउंडेशन कोर्स व बेसिक नाॅलेज देण्याकरिता लिफ्ट फाॅर अपलिफ्टमेंट या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे आणि डॉक्टर झाल्यावर दुर्गम भागात आपली सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन जी.आर.बोकडे यांनी केले. या कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच वेगवेगळ्या आश्रमशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.