
गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 हा पाच दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उद्घाटन समारंभ गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर आणि नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर समारोप अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या उपस्थितीत झाला. प्लॅटिनम ज्युबिली शाळेने खेळ आणि महोत्सवाच्या आयोजनात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार यावेळी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी काढले.
उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम शाळेचे महासचिव अझिझ नाथानी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी खेळामुळे आरोग्य तंदुरूस्त राहात असून मानसिक आरोग्य सुद्धा सुधारते व स्पर्धेची जाणीव होते. यातून संघभावना वाढते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. माझे शिक्षण याच शाळेत झाले असून मला आज जो सन्मान मिळाला तो माझ्याकरिता अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक ड्रिल सादर करून क्रीडा महोत्सवाची दिमाखदार सुरुवात केली. प्रि-प्रायमरी, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पाँम-पाँम व रिबन ड्रिल सादर करत निरागस उत्साहाचे दर्शन घडवले, तर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल ड्रिलद्वारे ‘PJSC’ ही रचना साकारत संघभावनेचा संदेश दिला. इयत्ता पाचवी, सहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम, स्टिक ड्रिल व झुंबा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींच्या साडी ड्रिलने कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण केले.
या महोत्सवादरम्यान चार हाऊसमधील विद्यार्थ्यांसाठी धावणे, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट आदी विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन केले होते. क्रीडा महोत्सवाचे एक विशेष आकर्षण म्हणून पालकांसाठी संध्याकाळी लगोरी, खो-खो, क्रिकेट, म्युझिकल चेअर्स, गरबा, टर्फ क्रिकेट, रस्सीखेच या स्पर्धांचे आयोजन केले होते. लगोरी स्पर्धेत ‘Best Moms’ टीमने विजेतेपद मिळवले, तर खो-खो स्पर्धेत ‘Lagori Queens’ टीम विजयी ठरली. क्रिकेट स्पर्धेत UDPL गडचिरोली टीमने बाजी मारली. म्युझिकल चेअर्स स्पर्धेत सुनीता मोहिते आणि मोनाली गावंडे यांनी विजेतेपद मिळवले.
पालकांनीही घेतला उत्साहाने सहभाग
पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा आणि पालकांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. या सर्धेमध्ये 150 पेक्षा जास्त स्पर्धा खेळण्यात आल्या. पालकांनी विविध खेळांमध्ये मनमुराद आनंद लुटला. शाळेने पालकांकरीता स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे त्यांनी शाळेचे अभिनंदन केले व यामुळे आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला अशी भावना व्यक्त केली. विजेत्या पालकांना गोल्ड, सिल्वर व ब्रांझ मेडल देवून सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
समारोप समारंभात ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी ड्रिल सादर केली. तसेच ‘महाराष्ट्र गीत’, कराटे, योगा आणि तलवार प्रात्यक्षिकांसह इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्री-प्रायमरी ते हायस्कूलपर्यंतच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले, “खेळात कोणीही पराभूत नसतो, प्रत्येक जण विजेता असतो. शालेय जीवनातील हे क्षण मनमुराद जगा, कारण हाच काळ आयुष्याचा सर्वात सुंदर आणि तुम्हाला घडविणारा टप्पा असतो.”
अतिरिक्त जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की, पालकांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, शिस्त पाळत सहभाग घ्यावा आणि क्रीडा महोत्सवाचा आनंद घ्यावा.
प्लॅटिनम जुबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अझिझ नाथानी यांनी खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे नमूद केले. प्राचार्य रहीम अमलानी यांनी क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा त्रिपाठी व निलिमा वाटेकर यांनी केले. या कार्याक्रमाला प्लॅटिनम जुबिली एज्युकेशन सोसायटीचे संयुक्त सचिव करिम लाखानी, संस्थेचे संचालक अमिरअल्ली नाथानी, संचालक अझिमा हुड्डा, शाळेचे हितचिंतक मिलिंद घरोटे, श्रीकांत भृगुवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शैक्षणिक प्रमुख अमीन नुरानी, उपप्राचार्य पारस गुंडावार, हेडमिस्ट्रेस समीरा लाखनी, प्रशासकीय अधिकारी राजा नायडू, समन्वयक नयना दरडमारे व रोजीना बुधवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम भव्य स्वरूपात यशस्वी झाला.
































