कॉम्प्लेक्स प्रभागातील मोठ्या नाल्याची समस्या दूर होणार

सभापती भरडकर यांचा पुढाकार

गडचिरोली : शहराच्या सोनापूर कॉम्प्लेक्स (प्रभाग क्रमांक 11) भागातील पंचवटीनगर, गणेशनगर, बजरंगनगर व रेव्हेन्यू कॉलनी या परिसरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. दरवर्षी या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात या नाल्यामुळे समस्यांला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या निकाली काढण्यासाठी नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी पुढाकार घेत नाल्याची पाहणी केली.

अनेक वर्षापासून स्थानिक रहिवाशांना नाल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या स्थायी स्वरूपात निकाली काढण्यासाठी सभापती भरडकर यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्यासोबत प्रत्यक्षात सदर नाल्याची पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांसोबत चर्चाही केली. हा प्रश्न निकाली काढून त्या परिसरातील विकास कामे पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी परिसरातील नागरिकांना दिली.

आरोग्याची समस्या उद्भवू नये म्हणून नालीसफाई, अस्वच्छता, विद्युत पथदिवे आणि पाण्याची गंभीर समस्या सभापती लीलाधर भरडकर यांनी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
मोठ्या नाल्याची समस्या दूर करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नाल्याी साफसफाई आणि खोलीकरण करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने रोशन कवाडकर, हिमांशू खरवडे, बादल कंकलवार, काव्य वालदे, अमोल जेट्टीवार, मंथन बुलबुले व स्थानिक नागरिक उपस्थित होते.