पाऊस नाही, पूर नाही तरीही वाहत्या पाण्यात दोघांना मिळाली जलसमाधी

एकाची ओळख पटली, दुसरा अनोळखी

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नदी-नाल्यांना पूर नाही. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारी दोन जणांचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील एक घटना धानोरा तालुक्यात तर दुसरी सिरोंचा तालुक्यात घडली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील चातगाव नजिकच्या दुधमाळा येथील रूषी रामजी दुगा हे शनिवार दि.5 रोजी गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी 4.30 ते 5 वाजताच्या सुमारास कठाणी नदीला अचानक पाण्याचा ओढा आला. त्यामुळे रूषी हा नदीत घसरून पडला आणि वाहात गेला. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला.

दुसऱ्या घटनेत सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनअंतर्गत शुक्रवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात आढळला. प्राणहिता नदीच्या एका उपनदीत हा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.