गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गरजू कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे बांधकाम झालेल्या गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत गावातील लाभार्थ्यांना गृहप्रवेश करण्यासाठी चाब्यांचे वाटप आमदार डॅा.देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार गरजूंचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कटीबद्ध आहे, अशी भावना यावेळी आ.होळी यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबासाठी महत्वाचा असणारा निवारा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार. प्रधानमंत्री आवास योजनेव्यतिरिक्त राज्यात अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना, अनुसूचित जातीकरिता रमाई आवास योजना, विमुक्त भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण वसाहत योजना. इतर मागासवर्गिंयांकरिता नव्याने मोदी आवास योजना कार्यान्वीत झाली आहे. प्रत्येक घटकातील गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले आहे.
याप्रसंगी माजी सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी डी.एम. साळवे, माजी पं.स. सदस्य रामरतन गोहणे, माजी पं.स.सदस्य केसरी उसेंडी, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे तथा तालुक्यातील ग्रामसेवक तथा तलाठी उपस्थित होते.