गडचिरोली : गेल्या चार दशकांपासून गडचिरोलीतील नक्षली आतंकाची दहशत महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही होती. त्यामुळे गडचिरोलीचे नाव काढले तरी बाहेरील लोक दचकायचे. 31 मार्चची ‘डेडलाईन’ स्वीकारून जिल्ह्यातून माओवादाच्या हिंसक विचारसरणीच्या या नक्षली आतंकाला समाप्त करण्याची कामगिरी अखेर गडचिरोली पोलिसांनी करून दाखविली. त्यामुळे आज गडचिरोलीकर भयमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या लाल आतंकाने गडचिरोली जिल्ह्यात चार दशकांत धुमाकूळ घालत तब्बल 559 निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. हिंसक कारवायांमध्ये 214 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहीद व्हावे लागले. त्यामुळे मागे वळून पाहिल्यास नक्षली आतंकाची ही दहशत किती भयंकर होती याची कल्पना येते.
आजच्या स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या रेकॅार्डवर 6 माओवादी शिल्लक आहेत. पण गेल्या 10 ते 12 दिवसांपासून त्यांचा छत्तीसगड सीमेवरच्या जंगलात सर्वत्र शोध घेऊनही ते सापडलेले नाहीत. त्यांच्या कोणत्याही हालचाली जिल्ह्याच्या हद्दीत नाहीत. त्यामुळे ते छत्तीसगडच्या आश्रयाला गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
11 पोलीस मदत केंद्रांमुळे अस्तित्वाला सुरूंग
अलिकडच्या 10 वर्षात पोलिसांनी हळूहळू आक्रमकता वाढवत नेत माओवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर देण्यास प्राधान्य दिले. याशिवाय स्थानिक नागरिकांची माओवाद्यांना साथ मिळू नये यासाठी नागरिकांचे पोलीसदादा बनून त्यांच्या अधिक जवळ जाण्यात ते यशस्वी झाले. छत्तीसगड सीमेकडील माओवाद्यांसाठी सेफ झोन असलेल्या 3 हजार चौरस किलोमीटरच्या घनदाट जंगलात यापूर्वी पोलिसांचा वावर नव्हता. पण गेल्या तीन वर्षात त्यात भागात तब्बल 11 पोलीस मदत केंद्रांची उभारणी करून माओवाद्यांच्या अस्तित्वाला गडचिरोली पोलिसांनी सुरूंग लावला. यातूनच अखेर नक्षली नेता भूपतीसह अनेक मोठ्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केले. 2005 पासून आतापर्यंत 794 माओवादी पोलिसांना शरण आले आहेत.
गडचिरोलीच नाही तर संपूर्ण देशभरात आता जेमतेम 100 च्या आसपास सशस्र माओवादी शिल्लक असल्याचे सांगितले जाते. पण त्यांना दिशा देणारे नेतृत्व शिल्लक नाही. अनेक मोठ्या कॅडरच्या नेत्यांनी आत्मसमर्पण केले, तर काही चकमकीत मारले गेले. त्यामुळे माओवादी सध्यातरी दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा स्थितीत माओवादी चळवळ संपल्यासारखीच असल्याचे मानले जात आहे.
































