Home दैनंदिन बातम्या कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे आदिवासी भागाचा विकास- धर्मरावबाबा

कर्मचाऱ्यांच्या सेवेमुळे आदिवासी भागाचा विकास- धर्मरावबाबा

भगवंतराव शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना धर्मरावबाबा आत्राम.

सिरोंचा : शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे माध्यम नाही, तर समाजघडणीची शक्ती आहे. तुम्ही या दुर्गम भागात अखंड परिश्रमाने काम केले आणि आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. अजूनही शेकडो कर्मचारी या संस्थेत सेवा देत आहेत. तुमच्या सेवेमुळेच या मुलांचे आयुष्य बदलेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि संपूर्ण कुटुंब व समाज उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव तथा आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

सिरोंचा येथे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सिनेट सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, संस्थेचे उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तसेच अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

धर्मरावबाबा पुढे म्हणाले, आजचा हा सत्कार तुम्हाला दिलेला छोटासा आदर आहे, तुमची निष्ठा आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणा आहे. शिक्षण संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा परिवर्तनाचा वाहक आहे. तुमच्या मेहनतीमुळे शाळांचे मानवीकरण झाले, मुलांच्या भवितव्यासाठी दार उघडले गेले आणि स्थानिक समाजाचे समग्र विकास साधला गेला. ही समर्पित सेवा नक्कीच स्तुत्य आहे.

कार्यक्रमात संस्थेतर्फे प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना शिक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यकाळातील आठवणींचे छायाचित्र व संस्थेच्या विकासात त्यांच्या योगदानाचा उल्लेख करून गौरव करण्यात आला. पहिल्यांदाच त्यांच्या कार्याचा सार्वजनिक सत्कार होत असल्याने ते भावनिक झाल्याचे पहायला मिळाले.

सिरोंचा तालुका मुख्यालयात नायब तहसीलदार म्हणून सेवाभावी काम करणारे श्रीनिवास तोटावर व सय्यद हमीद यांचा देखील आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते वेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.