आरमोरी : पत्नीवर प्रेम करणाऱ्या तरुणाला वडिलांनी आपल्या पत्नीला रागावणे पसंत नव्हते. त्याच मुद्द्यावरून वडीलांबद्दल मनात राग धरून बसलेल्या मुलाने निर्घृणपणे कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक करत 17 एप्रिलपर्यंत पीसीआर मिळवला आहे. मात्र जन्मदात्या वडीलांनाच जन्मातून उठविण्याची कुबुद्धी निर्माण होण्याइतपत त्याला कोणी भडकवले, असा प्रश्न चर्चेचा विषय झाला आहे.
देवाजी आडकू धकाते (65 वर्ष) रा.ताडुरवार नगर, आरमोरी असे मृत वडीलांचे तर योगेश देवाजी धकाते (25 वर्ष) असे मारेकरी मुलाचे नाव आहे. देवाजी धकाते यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. मुलगा योगेशही त्याच व्यवसायात हातभार लावतो. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला. त्यांचा संसार नीट सुरू होता. पत्नीला दिवसही गेले. तसतसा योगेश पत्नीची जास्त काळजी घेऊ लागला. पण भट्टीवरून परत आल्यानंतर देवाजी हे योगेशच्या पत्नीला घरातील चुकांसाठी रागवायचे. ती गरोदर असताना तिला जास्त कामे सांगू नका म्हणून बाप-लेकात अधूनमधून वादही होत असत.
दरम्यान घटनेच्या दिवशी देवाजी हे संध्याकाळी वीट भट्टीवरून घराकडे निघाले असताना दबा धरून बसलेल्या योगेशने वाटेतच त्यांना गाठले आणि अचानक कुऱ्हाडीने त्यांच्यावर घाव घातले. या हल्ल्याने देवाजी रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झाले. तिकडे योगेशने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून काढत काहीच झाले नाही या अविर्भावात घर गाठले. एवढेच नाही तर कुटुंबियांसोबत त्याने रात्री वडीलांना शोधण्याचे नाटक केले.
रात्री 9 च्या सुमारास आरमोरी पोलिसांना या हत्येची खबर मिळाली. त्यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून मुलगा योगेश याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो गडबडला आणि अखेर त्याने वडीलांच्या खुनाची कबुली दिली.
































