गडचिरोली : काँग्रेस पक्षात यापुढे ज्येष्ठ नेत्यांच्या मर्जीनुसार नाही तर कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल, असे सांगत काँग्रेसचे केंद्रीय आणि राज्याचे निरीक्षक म्हणून अनुक्रमे आ.मनिष यादव (राजस्थान) आणि माजी मंत्री डॅा.सुनील देशमुख, आमदार संजय मेश्राम गडचिरोलीत दाखल झाले आहेत. तब्बल पाच दिवस ते तालुकानिहाय काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
बुधवारी (दि.15) धानोरा मार्गावरील महाराजा सेलिब्रेशन हॅालमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला सुरूवात करण्यापूर्वी आ.मनिष यादव आणि डॅा.सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या या उपक्रमाचा उद्देश आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली. राज्यात सर्वत्र अशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविले जात असल्याचे ते म्हणाले. जिल्हास्तरावरील विद्यमान पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांच्या मनातील कोणी पदाधिकारी असेल तर त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, याचे निरीक्षण करून त्याची नोंद घेतली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्याचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे सादर केला जाणार आहे. सरसकट सर्व पदाधिकाऱ्यांना बदलविणार नाही. तरुण-तडफदार, कार्यक्षम पदाधिकारी असेल आणि त्यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांचा सकारात्मक प्रतिसाद असेल तर अशांना बदलविण्याची गरज नाही, असेही यावेळी डॅा.देशमुख यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, आ.रामदास मसराम, रविंद्र दरेकर, प्रकाश ईटनकर, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे, पंकज गुड्डेवार, कुसूम अलाम यांच्यासह काँग्रेसचे तमाम पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी, तर संचालन नगरसेवक सतीश विधाते यांनी केले.
असा राहणार संवाद कार्यक्रम
बुधवारी पत्रकार परिषदेनंतर केंद्र आणि प्रदेशच्या निरीक्षकांनी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली. दि.16 रोजी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट, दि.17 ला सकाळी 11 वाजता वडसा (देसाईगंज) येथे आरमोरी व देसाईगंज (वडसा) तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट आणि दुपारी 3 वाजता कुरखेडा येथे कोरची व कुरखेडा तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. शनिवार, दि.18 रोजी सकाळी 11 वाजता एटापल्ली येथे एटापल्ली व भामरागड तालुक्यातील, तर दुपारी 3 वाजता अहेरी येथे अहेरी व मुलचेरा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम होणार आहे. याशिवाय रविवार, दि.19 रोजी सिरोंचा येथे त्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद होणार आहे.
































