Home दैनंदिन बातम्या ईशा पोरेड्डीवार ठरल्या जिल्हा बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

ईशा पोरेड्डीवार ठरल्या जिल्हा बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

नाकाडे उपाध्यक्ष, निंबेकर सचिव

उपाध्यक्ष खिळसागर नाकाडेआणि मानद सचिव निंबेकर यांना पुष्पगुच्छ देताना निवडणूक निर्णय अधिकारी चंदेल.

गडचिरोली : राज्यातील सहकारी बँकांमध्ये वेगळा ठसा उमटविणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिवांचीही निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यात बँकेच्या अध्यक्षपदी ईशा प्रंचित पोरेड्डीवार, तर उपाध्यक्षपदी खिळसागर यादवराव नाकाडे आणि मानद सचिव म्हणून दीपक राजेश्वर निंबेकर हे पदारूढ झाले. विशेष म्हणजे ईशा पोरेड्डीवार यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला संचालकाला सदर बँकेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.

बुधवार, दि.15 एप्रिल रोजी बँकेच्या बैठक सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची सभा आयोजित केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश चंदेल यांनी जाहीर केलेल्या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमानुसार, तीनही पदासाठी एक-एकच अर्ज आले. ईशा पोरेड्डीवार यांच्यासह नाकाडे आणि निंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंदेल यांनी जाहीर करून त्यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

उच्चशिक्षित आणि अनुभवी पदाधिकारी

जिल्हा बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेल्या ईशा प्रंचित पोरेड्डीवार उच्चशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण बी.एससी., एम.बी.ए. (मानव संसाधन) आणि कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे कायदेशिर अनुपालन, कॅार्पोरेट गव्हर्नन्स, कंपनीचे भागधारक, व्यवस्थापन, मानव संसाधन आदी महत्वाच्या विषयांशी आणि बँकिंग व्यवसायाशी निगडीत असलेल्या त्यांच्या शिक्षणामुळे बँकेला याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उपाध्यक्षपदी निवड झालेले खिळसागर नाकाडे हे आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. याशिवाय मानद सचिवपदी निवड झालेले दीपक निंबेकर हे आरमोरी खरेदी विक्री सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष, तथा आरमोरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहात आहेत. या पदाधिकाऱ्यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव बँकेसाठी फायद्याचा ठरेल.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या निवडीप्रसंगी बँकेचे प्रथम अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, बँकेचे मावळते अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, श्रीहरी भंडारी, अनंत साळवे, डॅा.दुर्वेश भोयर, अतुल नागुलवार, डॅा.बलवंत लाकडे, खेमनाथ डोंगरवार, बंडूजी ऐलावार, तसेच बँकेचे नवनियुक्त संचालकगण सौरभ अनिल म्हशाखेत्री, योगाजी फटाले, श्रीकांत नागीलवार, गजानन साळवे, गोकुलदास भट, सुनील तेलकुंटलवार, प्रणिता चिटकेशी, नेत्रा साळवे, महेंद्र मने, ईश्वर पासेवार, छाया पोरेड्डीवार, निलिमा पोरेड्डीवार, लक्ष्मीबाई खेडकर, नलिनी निकुरे, निलिमा मेश्राम, अमोल खेडकर व हिरालाल शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. निवडीनंतर नवनियुक्त संचालक व माजी संचालकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.