Home दैनंदिन बातम्या शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

गुणवंतांचा डॉ.नेते यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली : येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल 90.35 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी डॉ.नेते यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिवकृपा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ओम संजय राठोड याने 86.71 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, आर्या नितीन पेंदोर हिने 81 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर मुमय नरेंद्र उंदीरवाडे याने 80.83 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “यश हे केवळ गुणांमध्ये नसून मेहनत, शिस्त आणि जिद्दीमध्ये असते. आजचे हे यश तुमच्या उज्ज्वल भवितव्याची सुरुवात आहे. भविष्यातही मोठे ध्येय ठेवून समाज व देशासाठी योगदान द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

या अभिनंदन सत्कार सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी.दुर्गम आणि संस्थेचे प्रतिनिधी महादेवराव पिंपळशेंडे, प्राध्यापक वृंद एन.आर. मोहुर्ले, एस.एच. वाटेकर, पी.जी.जाळे, कु.एम.एन.रोहनकर, कु.एच.जे.मडावी, कु.एम.डी.मानकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी के.एन.हवालदार, एस.आर.दिवसे, वि.बी. रोहनकर, सी.एन. शेट्टे, आर.ए. संतोषवार आणि पी.जी. कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.