गडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि.11 ते 20 मे दरम्यान पहिला टप्पा, तर दि.21 ते 30 मे दरम्यान प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा राहणार आहे. सदर प्रशिक्षण शिबिरात 10 वर्षावरील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.
जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया गडचिरोली, क्रीडा प्रबोधिनी तथा जिल्हा स्टेडीयम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे पहाटे 5.30 ते सकाळी 8 आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 8 या वेळेत हे शिबीर चालणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरात कुस्ती, व्हॉलीबॅाल, मैदानी खेळ, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी, बॉलबॅडमिंटन या खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. शिबिरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.






























