
गडचिरोली : महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यात गडचिरोली जिल्ह्यातील भंडारा–गडचिरोली द्रुतगती मार्ग, तसेच नवेगाव मोरे (जि.चद्रपूर) ते कोनसरी ते सुरजागड या ग्रीन फिल्ड मार्गाचा समावेश आहे. या मार्गामुळे गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात गुरूवारी ही पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली. महाराष्ट्राचे पूर्व व पश्चिम क्षेत्र जोडणाऱ्या आणि विदर्भातील विकासात महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या या प्रकल्पांची पुढील कार्यवाही जलदगतीने करून प्रकल्प वेळेत होईल यावर भर देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नवेगाव मोर ते सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यानी यावेळी केली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गांचे काम केले जाणार आहे. हे सर्व प्रकल्प सप्टेंबर 2028 ते डिसेंबर 2028 या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.
भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्ग
या मार्गाची एकूण लांबी 94.241 कि.मी. राहणार आहे. त्याचा प्रारंभ बोरगाव, जि.भंडारा पासून होऊन ऋणमोचन, जि.चंद्रपूर हा शेवटचा बिंदू राहील. हा मार्ग 3 अधिक 3 अस 6 पदरी राहणार आहे. या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन 1185.73 हेक्टर राहणार असून हा मार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार आहे.
नवेगाव मोरे त सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता
या मार्गाची एकूण लांबी 85.765 कि.मी. राहणा आहे. मार्गाचा प्रारंभ बिंदू नवेगाव मोरे (घाटकुळ), जि.चंद्रपूर ते मंगेर (जि.गडचिरोली) हा शेवटचा बिदू राहणार आहे. या मार्गावर लेनची संख्या 2+2 असा चार पदरी राहिल. यासाठी आवश्यक भूसंपादन 259.02 हेक्टर लागणार आहे. हा महामार्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडला जाणार आहे.






























