Home दैनंदिन बातम्या तिघांच्या मृत्यूस कारणीभूत एसटी बसच्या चालकावर गुन्हा दाखल

तिघांच्या मृत्यूस कारणीभूत एसटी बसच्या चालकावर गुन्हा दाखल

नेते मंडळीनी घेतली जखमींची भेट

जखमींची विचारपूस करताना मा.खा.डॅा.अशोक नेते
जखमींची माहिती घेताना आमदार डॅा.मिलिंद नरोटे
जखमींची विचारपूस करताना मा.आ.डॅा.नामदेव उसेंडी, सोबत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर

गडचिरोली : गडचिरोलीवरून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडकडे जाण्यासाठी चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला अवघ्या सहा किलोमीटर असलेल्या मुरखळाजवळ अपघात झाला. वळणाआधीच रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून ही बस 10 ते 12 फूट खोलगट असलेल्या भागात कोसळली. यामुळे 7 महिन्याच्या बालकासह एक महिला आणि एका वृद्धाला जीव गमवावा लागला. याशिवाय बसमधील 30 प्रवासी आणि चालक-वाहक जखमी झाले. या अपघातास कारणीभूत ठरवून चालक रोहित देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि मृत्यूस कारणीभूत असल्याची कलमे त्याच्यावर लावण्यात आली.

गडचिरोली-उमरखेड ही बस सकाळी 6.30 च्या वाजता गडचिरोलीवरून निघते. चंद्रपूर मार्गावरील ठिकठिकाणच्या थांब्यावरून प्रवासी घेत या बसने शहराची हद्द सोडली आणि नवेगाववरून मुरखळ्याकडे निघताच अचानक हा अपघात झाला. उतारातून बस खोलगट भागात जाताना बस पलट्या घेऊन सरळ झाली. पण यामुळे प्रवासी गाडीतल्या गाडीतच इकडे-तिकडे आणि एकमेकांवर आदळले. यात अनेकांना गंभीर दुखापत झाली.

आरडाओरड ऐकताच गावकऱ्यांनी मदतीसाठी तिकडे धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. गडचिरोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद चव्हाण यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे घेत आधी जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण रुग्णालयात उपचारादरम्यान ख्वाजा शहाबुद्दीन (68 वर्ष, रा.चंद्रपूर), लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार (49 रा.नवरगाव, जि.चंद्रपूर) आणि शिवांश स्वप्निल नवघडे (7 महिने, रा.गडचिरोली) यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. काहींना नागपूरला हलविण्यात आले आहे.

डॅा.नेते, डॅा.नरोटे, डॅा.उसेंडी रुग्णालयात

या दुर्घटनेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांच्या पत्नी, गडचिरोलीतील होमिओपॅथीचे तज्ज्ञ डॉ.गणेश जैन हेसुद्धा जखमी झाले आहेत. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आमदार डॅा.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांनी वेगवेगळ्या वेळी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची भेट घेतली. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, नगरसेवक सागर निंबोरकर यांनीही जखमींची भेट घेऊन अपघाताची माहिती जाणून घेत त्यांना धीर दिला.