गडचिरोली : विविध प्रसंगी घातपात घडविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या शस्त्रांस्त्रांची आणि स्फोटकांची निर्मिती करण्यासाठी माओवाद्यांनी बिनागुंडाच्या जंगलात गुप्त कारखाना उभारला होता. गेल्या 16 मे रोजी पोलिसांच्या ‘आॅपरेशन अंतिम प्रहार’नंतर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांकडून मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग दोन दिवस शोधमोहीम राबवून तो कारखाना शोधून काढला. त्या ठिकाणी जमिनीत लपवून ठेवलेले विविध साहित्य तिथेच नष्ट करण्यात आले.
विशेष अभियान पथकाच्या 6 चमू आणि बॅाम्ब शोधक-नाशक पथकाच्या 2 चमुंनी मिळून हे अभियान राबविले. नक्षल सप्ताह किंवा निवडणुकीसारख्या काळात दहशत निर्माण करण्यासाठी माओवादी हिंसक कारवाया घडवून आणत होते. त्यासाठी बिनागुंडाच्या जंगलातील या कारखान्यातून त्यांना विविध साहित्य आणि शस्र पुरविले जात होते.
दि. 21 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त 6 तुकड्या आणि बॅाम्ब शोधक-नाशक (बिडीडीएस) विभागाचे 2 पथक शोधअभियानासाठी रवाना केले होते. दिनांक 22 मे रोजी पोलीस मदत केंद्र बिनागुंडाच्या उत्तरेकडील जंगल परिसरात विशेष अभियान पथकांनी घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली.
घटनास्थळावर मिळाले हे साहित्य
यावेळी जंगलातील माओवाद्यांच्या ठिय्यावरून एक लेथ मशीन, बिजीएल पाईप्स, 12 बोअर पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटरी, ग्राइंडींग/ड्रिलींग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल, फुटबॉल पाईप (20 फुट) इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरून सर्व माओवादी साहित्य जवानांच्या मदतीने जागीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली आणि प्राणहिता, तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.
































