गडचिरोली : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत असलेल्या दरांविरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवारी जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. जोरदार नारेबाजी करत पंतप्रधान मोदींवर टिका करत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना ‘चॅाकलेट’चे वाटप करून महागाई विसरण्याचा सल्ला देण्यात आला.
“बहुत हो गई महंगाई की मार, हद्दपार करो मोदी सरकार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी ॲड.विश्वजीत कोवासे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत वाढती महागाई ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठे संकट ठरत असल्याचे सांगितले. मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनाही डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत असून शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्याने नागरिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या सचिव कुसुम अलाम, माधुरी मडावी, माजी नगरसेवक विजय गोरडवार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, माजी नगरसेवक रवींद्र किरमिरवार, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विवेक घोंगडे, अभिजीत घाईत, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, श्रीनिवास आंबटवार, अविनाश साळवे, मिलिंद बागेसार, शालिनी पेंदाम, रीता गोवर्धन, कविता उराडे, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, शितल ठवरे, उमाजी बारसागडे, तुळशीदास भोयर, सरपंच संजय गावडे, जितेंद्र मुप्पीडवार, युवराज जुवारे, योगेश नैताम, नंदू सोमणकर, चारुदत्त पोहाणे, अतुल राचमलवार, सोनू अलाम, सचिन सोमनकर, नंदू सोमनकर, अभिषेक चौधरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वनवासी’ संबोधल्याने अमित शाहंचा निषेध

केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या आदिवासी मेळाव्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींचा उल्लेख ‘वनवासी’ असा केला. याचा काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. आदिवासी हे मूलनिवासी आहेत, त्यांना वनवासी म्हणून हिनवणे हा त्यांचा अपमान असल्याचे अॅड.विश्वजित कोवासे म्हणाले. यावेळी शाह यांच्याविरूद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. हा विषय संयुक्त राष्ट्रसंघात नेऊन शाह यांच्यावर अॅट्रॅासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसूम अलाम यांनी केली.
































