गडचिरोली : 2026 च्या भरतीमध्ये गडचिरोली पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या तब्बल 175 गुणवंतांचा शहरातील गुरुकुल अकॅडमीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. येथील कमल-केशव सभागृहात हा कार्यक्रमा मोठ्या उत्साहात झाला. सलग तिसऱ्या वर्षी गुरुकुल अकॅडमीने गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत सर्वाधिक निकाल देऊन हॅट्रिक नोंदवली हे विशेष.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचिरोली न.प.चे माजी सभापती प्रा.राजेश कात्रटवार, तर अध्यक्षस्थानी गुरुकुल अकॅडमीचे संचालक तथा मार्गदर्शक पुष्पक सेलोकर होते. प्रमुख अतिथी म्हणून युवा वक्ते तथा लेखक तुषार दुधबावरे, शैलेश खरवडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्रीमती सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंतांनी यश डोक्यावर न घेता, यश पचवून आपल्या पदाचा, आपल्या जवाबदारीचा सामान्य नागरिकांना कसा उपयोग होईल, आपल्याला आपल्या खाकीची गरिमा अबाधित कशी ठेवता येईल, या बाबींचा विचार करून आपले कर्तव्य बजावायचे आहे, असे मनोगत त्यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.
प्रमुख अतिथी तुषार दुधबावरे यांनी ‘गडचिरोली पोलीस यंत्रणा ही केवळ नागपूर परिक्षेत्रातील, किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशामधील अव्वल पोलीस दल म्हणून संपूर्ण देशात नावारूपास आले आहे. बंदुकीच्या आवाजापेक्षा आज दुर्गम भागात विकासाची नवी पहाट होत आहे。गडचिरोली जिल्हा पोलिस आणि सी-60 जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय साहस दाखवून नक्षलवाद्यांच्या कारवाया मोडून काढल्या आहेत. वर्षानुवर्षे नक्षलवाद्यांच्या भीतीने गप्प बसलेला आदिवासी समाज हळूहळू सरकारकडे विश्वासाने बघू लागल्याचे आपण बघत आहोत, असे ते म्हणाले.
गुरुकुलचे मार्गदर्शक शैलेश खरवडे यांनी पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या गुणवंतांनी विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणात भर टाकायला हवी असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अकॅडमीचे संचालक पुष्पक सेलोकर यांनी मागील तीन वर्षांपासून गुरुकुल अकॅडमीने सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे, ही खरोखरच गुरुकुलसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
गुरुकुल अकॅडमीच्या प्रशिक्षण बॅचमध्ये यावर्षी बादल राजेंद्र गावतुरे हे पुरुष गटातून जिल्ह्यात प्रथम तर महिला गटामधून अमिषा कोवे जिल्ह्यात द्वितीय, शितल देशमुख जिल्ह्यात तृतीय, कोकिळा भोयर तृतीय, अमिषा घाटूरकर चतुर्थ तर तराना नैताम जिल्ह्यात महिला गटात पाचवी आणि पल्लवी कुमरे, नूतन कुमरे, अश्विनी कुमरे या एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींची गडचिरोली पोलीस दलात निवड झाली आहे.
































