गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे भूसंपादन करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. त्यानुसार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम 32 (2) अन्वये संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे केवळ आंदोलन – मोर्चाच्या भ्रमात न राहता ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी वाचवायच्या आहेत त्यांनी विहित मुदतीत सदर नोटीसावर लेखी आक्षेप सादर करुन शेतजमिनी देण्यासाठी विरोध करावा, असे आवाहन डाव्या लोकशाही पक्षांनी केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले की, भेंडाळ्यात कोणत्याही परिस्थितीत जिंदाल स्टील कारखान्यासाठी जमिनींचे भूसंपादन करायचेच अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संभ्रमात टाकून जमीनीच्या भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी द्यायच्या नसल्याने ते विरोध करीत आहेत. या विरोधाला हाणून पाडण्यासाठी आता कंपनी आणि सत्ताधारी लोकांकडून शेतकऱ्यांना भ्रमीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असाही आरोप करण्यात आला.
भूसंपादन अधिकाऱ्यांनी कलम 32(2) नुसार बजावलेल्या नोटिसीला शेतकऱ्यांनी उत्तर देवू नये, यासाठी काही तथाकथित कार्यकर्ते शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांनी सदर नोटीसावर लेखी आक्षेप सादर केले नाही तर शेती वाचवण्यासाठी भविष्यात न्यायालयीन संघर्ष करायचे असल्यास आडकाठी निर्माण होवू शकते. त्यामुळे एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या कचाट्यातून आपल्या जमिनी वाचवू इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांनी जमीनीच्या भूसंपादनाचा स्पष्ट विरोध करावा. या आक्षेपपत्रात कोणत्याही परिस्थितीत आम्हाला वाढीव दर द्यावा, शेतकऱ्यांशी चर्चा करावी, प्रकल्पात नोकरी द्यावी अशी मागणी करू नये, असे डाव्या पक्षांनी सूचविले.
काही कार्यकर्ते शेतकऱ्यांना फसविण्यासाठी भ्रमित व द्विधा निर्माण होणारे दर द्या, नोकरी द्या असा उल्लेख असलेले आक्षेप सादर करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले आहे.
































