गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेंढरी उपपोलीस स्टेशनच्या हद्दीत दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले. यात स्कॅार्पिओसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी चालकाला पोलिसांनी अटक केली असली तरी सोबतचे दोघे पळू गेले. या कारवाईमुळे दारू तस्कर म्हणून कुख्यात असलेला कोरची येथील निर्मल धमगाये पुन्हा या व्यवसायात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशानुसार गडचिरोलीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लखन जोहारी भैसा (40 वर्ष) रा.बेडगाव, ता.कोरची हा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्कॉर्पिओ वाहनाने (सी.जी. 08 ए.आर. 5976) मौजा मंगेवाडा मार्गाने अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करुन उपपोस्टे पेंढरी हद्दीतील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार होता. यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मंगेवाडा ते पेंढरी गावाकडे जाणाया रस्त्यावर दोन पंचासह सापळा रचला.
पोलिसांच्या इशाऱ्यानुसार, वाहन चालकाने रत्याच्या कडेला वाहन थांबविल्यानंतर पोलिसांना पाहून शेतशिवाराचा व अंधाराचा फायदा घेत दोघे जण पळून गेले. मात्र वाहन चालक लखन भैसा पोलिसांच्या हाती लागला. वाहनाची तपासणी केली असता त्यात 4 लाख रुपयांची विविध प्रकारची दारू होती.
पोलिसांनी आरोपी चालक लखन जोहारी भैसा, तसेच फरार आरोपी निर्मल धमगाये व तरुण धमगाये, दोघेही रा.कोरची यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांचा शोध आणि तपास पोउपनि.शुभम जाधव करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत, अंमलदार प्रशांत गरफडे, सचिन घुबडे, चालक दीपक लोणारे यांनी पार पाडली.
































