गडचिरोली : निकृष्ट दर्जाचे फ्रोजन डेझर्ट (एक प्रकारचे आईसक्रिम) तयार करून ते अस्वच्छ ठिकाणी साठवणूक करून ठेवणे, पॅकिंगवर निर्मिती आणि वापर करण्याची मुदत दर्शवणारी तारीख नसणे, अशा एफडीएच्या नियमांना डावलणाऱ्या गडचिरोलीच्या लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीचा परवाना अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त जी.टी.सातकर यांनी निलंबित केला.
अन्न प्रशासन विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी धानोरा मार्गावरील वॅार्ड नं.4 मध्ये असलेल्या लक्ष्मी आईस फ्रुट फॅक्टरीवर टाकलेल्या धाडीत तेथील गैरप्रकार दिसून आला होता. ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. जप्त फ्रोजन डेझर्टच्या नमुन्याचा प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
हे फ्रोजन डेझर्ट वापरून तयार केलेल्या आईसक्रिम कोन, आईसक्रिम डबे जप्त करून ते नष्ट करण्यात आले. हे फ्रोजन डेझर्ट लवकर खराब होणाऱ्या स्वरूपाचे असल्याचे पथकाला आढळून आले होते. एफडीएच्या नियमांची पूर्तता न करता हा कारखाना चालविल्या जात होता. अन्न सुरक्षा अधिकारी जे.एम. कुंजाम आणि अन्न सुरक्षा अधिकारी एस.पी. तोरेम यांनी ही कारवाई केली.
































