गडचिरोली : जिल्ह्यात रविवारी (दि.28) राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल 77 हजार 666 चिमुकल्यांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. यात जिल्ह्याचे 92.53 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
गडचिरोलीत आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सीईओ सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात पोलिओ डोस पाजण्यासाठी एकूण अपेक्षित लाभार्थी (उद्दिष्ट) 82,984 होते. त्यापैकी प्रत्यक्ष 76,789 बालके (0 ते 5 वर्ष वयोगटातील) आणि 5 वर्षावरील 877 अशा एकूण 77 हजार 666 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
पोलिस डोसमधून सुटलेल्या बालकांसाठी घरोघरी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांनी दिली. बुथवरील मोहिमेच्या दिवशी जे लाभार्थी कोणत्याही कारणास्तव पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी आता ‘आयपीपीआय’ टीममार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. सुटलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना डोस देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
त्यासाठी शहरी भागात सलग 5 दिवस, तर ग्रामीण भागात सलग 3 दिवस आरोग्य विभागाच्या टीम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील. ‘एकही मूल लसीकरणातून सुटता कामा नये’ या उद्देशाने लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.
लसीकरणासोबतच ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, घरोघरी जाणाऱ्या या पथकांमार्फत केवळ पोलिओ लसीकरणच केले जाणार नाही, तर या सर्वेक्षणादरम्यान ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’ देखील केले जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
पोलिओ लसीकरण आणि ताप सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचा डोस नक्की पाजा आणि देशाच्या पोलिओमुक्तीच्या लढ्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पालकांना आणि नागरिकांना करण्यात आले आहे.
































