अहेरी : येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात सोमवारी ‘ताला ठोको’ आंदोलन आयोजित केले होते. पण पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांना रोखून स्थानबद्ध केले.
नगरसेवक मुक्कावार यांनी 22 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्यामार्फत निवेदन सादर करून महिला व बाल रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. या निवेदनात 28 जूनपर्यंत पदभरती न झाल्यास 29 जून रोजी ‘ताला ठोको’ आंदोलन आणि त्यानंतर 30 जूनपासून राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते महिला व बाल रुग्णालय परिसरात दाखल झाले. रिक्त पदे तातडीने भरावीत या मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबविले. त्यानंतर महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.के.डी. मडावी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे आरोग्य उपसंचालकांशी आंदोलनकर्त्यांचा संवादही घडवून आणला. मात्र पदभरतीबाबत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचे ठरवले. त्यांनी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून नगरसेवक मुक्कावार यांच्यासह चार जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य तणाव टळला आणि रुग्णालयातील कामकाज सुरळीत सुरू राहिले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय न झाल्यास पूर्वघोषणेनुसार 30 जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
































