Home क्राईम आरमोरीत बिनधास्तपणे चालत असलेल्या दारू वाहतुकीचा पर्दाफाश

आरमोरीत बिनधास्तपणे चालत असलेल्या दारू वाहतुकीचा पर्दाफाश

3 वाहनांसह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरमोरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक करून छुप्या मार्गाने विक्री करण्याचा प्रयत्न नेहमीच होतो. मात्र त्याविरुध्द कारवाईचे फास आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी दिल्यानंतर आरमोरी पोलिसांच्या पथकाने बिनधास्तपणे दारूची खेप पोहोचवण्यासाठी उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एक दुचाकी वाहन पकडून देशी-विदेशी व हातभट्टीची मोहा दारू जप्त केली. यातील दोन आरोपींना अटक केली, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

वरिष्ठांचे आदेश मिळाल्यानंतर आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते व पथकाने आरमोरीच्या आझाद चौकाजवळील टॅावरजवळच्या खुल्या मैदानावर उभ्या असलेल्या देशी-विदेशी दारूने भरलेल्या तीन चारचाकी वाहनांची तपासणी केली. त्यात विविध आकाराच्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी दारूसह देशी आणि हातभट्टीचीही दारू आढळली. एकूण 6 लाख 55 हजार रुपयांची ही दारू जप्त करण्यात आली. याशिवाय चारही वाहने असा एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत प्रवीण भाऊराव खोब्राागडे (31 वर्षे), रा.फुले वार्ड, आरमोरी आाणि रुपेश रेखचंद ठवरे (29 वर्ष) रा.आझाद चौक, आरमोरी यांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी राहूल कैलास टेंभुर्णे (42 वर्ष) रा.इंदिरा नगर, बर्डी, आरमोरी हा मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. पुढील तपास पोउपनि.नरेश सहारे करीत आहेत.

महिनाभरात दारूसंदर्भात 287 गुन्हे

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. जून 2026 या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्रातील विविध पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें येथे अवैध दारु विक्री व वाहतूक प्रकरणी एकूण 287 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण 1 कोटी 94 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच पोलीस अधीक्षक गडचिरोली एम.रमेश यांनी अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. कैलास गवते, पोउपनि. नरेश सहारे, पोहवा पिल्लेवान, वालदे, तोरे, अंमलदार सराटे, झाडे, कुमोटी व बारहाते यांनी पार पाडली.