
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील विला अर्बन हॉटेल-धाबा गोविंदपूर येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळा अतिशय उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. नेते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश पाठविला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील आपल्या सहकाऱ्यांमार्फत विशेष मानाचा हार, फ्रेम केलेला शुभेच्छा संदेश पाठवून डॉ.अशोक नेते यांना शुभेच्छा दिल्या. या विशेष शुभेच्छांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यासोबतच महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार रामदास तडस यांनी दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आपल्या मनोगतात डॉ.नेते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे संघटन जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक प्रवासातील खरा केंद्रबिंदू म्हणजे कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ परिश्रमामुळेच संघटना अधिक मजबूत झाली आहे. सर्व स्तरातून लाभलेले प्रेम, स्नेह, आपुलकी आणि शुभेच्छा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. मी प्रत्येकाचा मनःपूर्वक ऋणी आहे. आपण दाखविलेल्या विश्वासाला मी जनसेवेच्या माध्यमातून कायम न्याय देत राहीन.”
अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी डॉ.अशोक नेते यांच्या जनसंपर्क, संघटन कौशल्य, आदिवासी, ओबीसी व सर्वसामान्य समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, कि.मो. प्रदेश सचिव रमेश भुरसे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, गडचिरोली न.प.चे बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, डॉ.चंदा कोडवते, नाना नाकाडे, सुधाकर येनगंदलवार, डॉ.भारत खटी, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, गोवर्धन चव्हाण तसेच नागपूरवरून रंजित आडे, अक्षय उईके, कौशिक जोशी, मोहम्मद शकिल खान, श्रीकांत मोहरकर, आकाश वर्मा, हितेश डोंगरे यांच्यासह चामोर्शी, धानोरा, आरमोरी, वडसा आणि सावली येथील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेम, आपुलकी आणि जनसंपर्काचा अनोखा संगम ठरलेला हा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

डॅा.अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी दिवसभर विविध सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर गडचिरोलीचे आराध्य दैवत सेमाना देवस्थान येथे दर्शन व पूजा-अर्चना करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
यानंतर चामोर्शी रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्यात आली. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात ‘एक घास माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. याशिवाय डॉ.नेते यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली.































