
गडचिरोली : राज्याचे विकासाभिमुख मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या पुढाकारातून शहरात विविध सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडले.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजहित जपणारे, गरजूंच्या सेवेसाठी समर्पित आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे उपक्रम राबविण्याची सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार गडचिरोलीत गरजूंना वेळेत रक्तपुरवठा होण्यासाठी रक्तदान शिबिर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांना स्वावलंबी होऊन कुटुंबाला हातभार लागावा यासाठी शिलाई मशिनचे वाटप, तसेच महिला व बाल रुग्णालयात फळे व अन्नदान वाटप, ‘एक घास माणुसकीचा’ उपक्रमातून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान, मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे (कीट) वाटप, तथा वृद्धाश्रम परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष या जनसंपर्क कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. नगर परिषदेच्या नगरभवनात शिलाई मशिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वृद्धाश्रमात अन्नधान्य किट वाटप करताना डॉ.अशोक नेते म्हणाले “ज्येष्ठ नागरिकांसोबत अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणे ही अत्यंत आनंददायी बाब आहे. वृद्धांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणे हीच खरी सेवा आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी सर्वात मोठा आनंदोत्सव ठरेल, असे सांगत त्यांनी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना आपापल्या परिसरात अशाच लोकहितवादी व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रामुख्याने आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष अॅड.प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कि.मो.प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते, न.प.बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
































