

गडचिरोली : भारतीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कर्तव्यावर असताना गोळीबारात मृत्यू ओढवलेल्या सुरेश आंबाडार या जवानाचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी मूळ गावी मरारटोला (ता.कुरखेडा) येथे आणण्यात आले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी ‘शहीद सुरेश आंबाडार अमर रहे’ अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
2012 मध्ये बीएसएफमध्ये रुजू झालेले सुरेश आंबाडार हे सध्या पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेवर कर्तव्यावर होते. त्यांचे पार्थिव बीएएसएफ जवानांनी शनिवारी रात्री गावात आणल्यानंतर त्यांच्या पत्नी, आईसह कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. अवघी दोन वर्षाची त्यांची मुलगी निरागसपणे काकाच्या कडेवरून हे सर्व चित्र न्याहाळत होती. जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले गावकरी नि:शब्द झाले होते. पण त्या निरव शांततेला चिरत सुरेश यांच्या पत्नीचा टाडो सर्वांचे मन हेलावत होता.
यावेळी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांनी पुष्पचक्र वाहिले. तसेच माजी आमदार कृ्ष्णा गजबे, सुरेश आंबाडार यांचे कुटुंबिय यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली दिल्यानंतर रात्री अंत्यसंस्कार पार पडले. सती नदीच्या घाटावर झालेल्या या अंत्यसंस्काराला संपूर्ण गाव उलटला होता.
































