
गडचिरोली : कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी 27 वा कारगिल विजय दिवस रविवारी (दि.26 जुलै) गडचिरोली येथे विविध देशभक्तिपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कारगिल विजय रॅलीने झाली. या रॅलीत आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्यासह शालेय विद्यार्थी, नागरिक आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली कारगिल चौकातील शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यानंतर शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ.अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे जनरल मॅनेजर लेफ्ट.कर्नल रामनाथ स्वामी, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे सिनिअर जनरल मॅनेजर कृष्णा रेड्डी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, व्यापारी संघटनेचे घिसुलाल काबरा, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष होमराज डोनाळकर, कारगिल समितीचे अध्यक्ष ऋषी वंजारी, वीरपत्नी सुधा चंदनखेडे, आरमोरी येथील चंदा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद वीर जवानांना आदरांजली वाहिली. सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे नोटबुकांचे वाटप करून गौरविण्यात आले.
गडचिरोलीतील कारगिल स्मारक हे जिल्ह्याच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जाते. या स्मारकाच्या उभारणीसाठी कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांनी सन 2000 पासून तब्बल 22 वर्षे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या दीर्घ संघर्षानंतर 2022 मध्ये गडचिरोली शहरात शहीद वीर जवानांच्या स्मृती जपणारे हे स्मारक साकार झाले. या कार्याचा सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला. कारगिल चौक येथे गेल्या 27 वर्षांपासून कारगिल विजय दिनानिमित्त शहीद वीर जवानांना मानवंदना अर्पण करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे.
कारगिल स्मारक समितीचे प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), हवालदार कैलास सिडाम (नि.) तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, गणमान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक हवालदार डिसेज वालदे यांनी केले.






























