गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य सेवेमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत सिकलसेल आजाराच्या निदानासाठी अत्याधुनिक ‘गर्भजल तपासणी’ सुविधा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे सिकलसेलग्रस्त अथवा सिकलसेल वाहक दांपत्यांना गर्भधारणेदरम्यान गर्भातील बाळाला सिकलसेल आजार आहे की नाही, याचे अचूक व वेळेत निदान करणे शक्य होणार आहे. ‘सिकलसेलमुक्त गडचिरोली’च्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके, संकल्प फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण तुलनेने अधिक असल्यामुळे या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी वेळेवर निदान आणि योग्य समुपदेशनाला विशेष महत्त्व आहे. नव्याने सुरू झालेल्या या सुविधेमुळे गर्भातील बाळामध्ये सिकलसेल आजाराची शक्यता अचूकपणे तपासता येणार आहे. त्यानुसार संबंधित कुटुंबांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुढील उपचारांचे नियोजन करता येणार आहे.
यापूर्वी अशा प्रकारच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत होता. आता ही सुविधा महिला व बाल रुग्णालयातच उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, वेळ व आर्थिक खर्चात मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्याने गरजू कुटुंबांना उपचार प्रक्रियेत अधिक सुलभता प्राप्त होणार आहे.
जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि संकल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेला हा उपक्रम सिकलसेल आजाराविरुद्धच्या लढ्यात प्रभावी ठरणार आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त, सिकलसेल वाहक अथवा संशयित कुटुंबांनी महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे सुरू करण्यात आलेल्या या अत्याधुनिक गर्भजल तपासणी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
































