Home राजकीय घडामोडी क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत ‘चरखे के पास चर्चा’ उपक्रम

क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत ‘चरखे के पास चर्चा’ उपक्रम

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा दौरा करून समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ‘चरखे के पास चर्चा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष कृती समितीकडून क्रांती दिन (9 आॅगस्ट) ते स्वातंत्र्य दिनापर्यंत (15 आॅगस्ट) या उपक्रमात ‘चरखे के पास चर्चा’ केली जाणार आहे. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनाने प्रेरित हे आंदोलन राहणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समस्यांचा उहापोह केला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय विविध प्रकल्पांसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करू नये, आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करावे, आरोग्य सेवेची अपुरी उपलब्धता, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा अभाव, शेती आणि सिंचनाच्या मर्यादा, बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा वाढवाव्यात, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना, जिल्ह्यातील सर्व विभागांची रिक्त पदे भरावी अशा अनेक समस्यांवर या अभियानादरम्यान चर्चा घडवून आणल्या जाणार आहे.

समाजातील विविध क्षेत्रातील लोक या चर्चेत सहभागी होणार आहेत. आम्ही पालकमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या चर्चेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार, अनिल कोठारे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.