Home पब्लिक प्रॉब्लेम गुरनोलीच्या तलावातील पाण्याने 10 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान

गुरनोलीच्या तलावातील पाण्याने 10 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान

मा.आ.कृष्णा गजबे यांच्याकडून पाहणी

कुरखेडा : तालुक्यात मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात गुरनोली गावातील सुमारे 70 वर्षांपूर्वीचा तलाव फुटला. या तलावाचे पाणी प्रचंड वेगाने बाहेर पडून परिसरातील शेतांमध्ये शिरल्याने 10 हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी भेट देऊन फुटलेला तलाव आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

तलाव फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी शेतांमध्ये शिरून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

दरम्यान, गुरनोली–पिंपळगाव मार्गही पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने नागरिकांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, भाजपा किसान आघाडीचे अध्यक्ष राकेश खुणे, अरविंद लांजेवार, माणिक लांजेवार, विवेक बुद्धे, देवानंद पाटील खुणे, नितीन खुणे, श्रीकांत गोबाडे, प्रमोद करंडे, ग्राम महसूल विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.