
गडचिरोली : जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी वाचविण्यासह जिल्ह्यातील विविध मूलभूत समस्यांना वाचा फोडण्यासाठी, स्वातंत्र्याच्या वारशाचे स्मरण, विचारांचे मंथन आणि भविष्यातील दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले ेहोते. या कार्यक्रमाचा समारोप स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्ट रोजी गडचिरोली शहरात भव्य मानवी साखळी तयार करून करण्यात आला.
या मानवी साखळीत जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सुपीक शेतजमिनींचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क, रोजगार, आरोग्य, शिक्षण, वाहतूक तसेच जिल्ह्यातील विविध मूलभूत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने आवाज बुलंद केल्याचे पहायला मिळाले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले, ‘चरखे के पास चर्चा’ या कार्यक्रमाचा समारोप झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई संपलेली नाही. जिल्ह्यातील सुपीक शेतजमीन आणि शेतकरी वाचविण्यासाठी आता पुढची लढाई गावागावात लढली जाणार आहे. या लढ्यात महिला भगिनींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“आपल्या हक्कांच्या लढ्यात समाजात फूट पाडण्याचा आणि इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होऊ शकतो. मात्र, अशा कोणत्याही प्रयत्नांना बळी न पडता शेतकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी एकजूट कायम ठेवून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चरखे के पास चर्चा’ या लोकसंवाद कार्यक्रमात विविध राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील प्रश्नांवर आपली मते मांडली. शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यात आपण सहभागी असून त्यांना संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.
या समारोपीय कार्यक्रमास महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ.अनंत कुंभारे, दिवाकर निसार, कुसुम आलाम, अनिल कोठारे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनीषा खेवले, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, नेताजी गावतुरे, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, अब्दुल पंजवाणी, सुनील चडगुलवार, उत्तम ठाकरे, विजय लाड, सुभाष कोठारे, रोडे महाराज, तात्याजी चिचघरे, विजय शेंडे, जावेद खान, निकेश कामीडवार, राजाराम ठाकरे, देवेंद्र ब्राह्मणवाडे, श्रीनिवास ताडपल्लीवार, डॉ.शीतल ठवरे, रीता गोवर्धन, मिनल चिमूरकर, उईके ताई, ढीवरू मेश्राम, देवानंद कुमरे, विकास जेंगठे यांच्यासह हजारो शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
‘चरखे के पास चर्चा’च्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेने मांडलेल्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा पुढील काळातही सुरू ठेवण्यात येणार असून, शेतकरी व नागरिकांच्या हक्कांसाठी गावागावात लोकसंवाद आणि जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
































