गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरच्या आणि राज्याच्या पूर्व टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे चार दिवस बाहेरील जगाशी संपर्क तुटून काही रुग्णांची परिस्थिती गंभीर झाली होती. अशा स्थिती त्या रुग्णांना अहेरी, गडचिरोली अथवा नागपूर येथे उपचारासाठी हलविणे मोठे आव्हान ठरते होते. मात्र भामरागडमधील आरोग्यसेवेला लॅायड्स मेटल अॅन्ड एनर्जी लिमिटेडने तातडीने मदतीचा हात दिल्याने रुग्णसेवेला मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे पूरस्थिती निवळल्यानंतरही लॅायड्सचे तज्ज्ञ डॅाक्टरांचे पथक भामरागडमध्ये सेवा देत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यातील पूरपरिस्थितीची माहिती मिळताच लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी तातडीने विशेष वैद्यकीय पथक पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हेलिकॅाप्टरने भामरागडमध्ये दाखल झाले. पुरामुळे रस्ते बंद असतानाही आरोग्यसेवा खंडित होऊ नये, गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि गरज भासल्यास त्यांना पुढील उपचारासाठी सुरक्षितपणे हलविता यावे, यासाठी या पथकाने काम सुरू केले.
पूर ओसरला; मात्र आरोग्यसेवा कायम
भामरागडमधील पूरस्थिती चार दिवसांनंतर ओसरली असली तरी आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती अद्याप संवेदनशील आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुरू असून गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. दरम्यान, कुकामेट येथील मालु पीडो वड्डे या रुग्णाला मेंदूवरील शस्त्रक्रियेची तातडीची गरज असल्याचे समोर आले. भामरागडमध्ये आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नसल्याने वेळ न दवडता रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. यासाठी क्रिटिकल केअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली.
हेडरीचे वैद्यकीय अधीक्षक भामरागडमध्ये
पूरस्थिती निर्माण झाल्यापासून रुग्णांच्या सेवेसाठी हेडरी येथील काली अम्माल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोपाल राय यांनी भामरागडमध्ये तळ ठोकून विशेष लक्ष दिले. प्रतिकुल परिस्थितीतही वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यासाठी डॉ.गोपाल राय, डॉ.चंदर, डॉ.रवीतेजा आणि डॉ.पंकज यांच्या पथकाने सातत्याने प्रयत्न केले.
गंभीर रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच गरज भासल्यास त्यांना पुढील उपचारासाठी बाहेर हलविता यावे, यासाठी या वैद्यकीय पथकाने भामरागड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोहर कन्नाके यांच्यासोबत समन्वयाने काम केले.
‘वेळेवर उपचार हाच सर्वात मोठा दिलासा’
भामरागडसारख्या अतिदुर्गम आणि पूरप्रवण भागात रस्ते बंद असताना आरोग्यसेवा पुरविणे हे मोठे आव्हान असते. अशावेळी एअर लिफ्टद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल करणे आणि गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी सुरक्षितपणे हलविण्यासाठी पुढाकार घेणे, ही बाब रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक ठरली.
पूरपरिस्थितीत सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले असताना आरोग्यसेवा खंडित होऊ नये, यासाठी लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. विशेषतः गंभीर रुग्णांच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर तज्ज्ञ वैद्यकीय पथक उपलब्ध करून देणे आणि गरजेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था करणे, यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
पूराच्या संकटात प्रशासन, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांसोबत उद्योग समूहानेही पुढे येऊन मदतीचा हात दिल्याने भामरागड तालुक्यात लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडच्या वैद्यकीय उपक्रमाचे कौतुक होत आहे.
“पूरपरिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे गंभीर रुग्णांना बाहेर हलविणे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत लॅायड्स मेटल्सच्या वैद्यकीय पथकाने ग्रामीण रुग्णालयाच्या टीमसोबत समन्वयाने काम केले. त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर आवश्यक वैद्यकीय उपचार देता आले. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एअर लिफ्ट करून सुरक्षितपणे हलविण्यात आले. या संपूर्ण काळात लॅायड्सच्या वैद्यकीय पथकाचे सहकार्य उल्लेखनीय ठरले.”
– डॉ.मनोहर कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, भामरागड
































