Home दैनंदिन बातम्या तिरंगा बाईक रॅलीत मोटरसायकलवर स्वार झाले सहपालकमंत्री जयस्वाल

तिरंगा बाईक रॅलीत मोटरसायकलवर स्वार झाले सहपालकमंत्री जयस्वाल

जिल्हा पोलिसांच्या पुढाकाराने आयोजन

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा जागर करत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने काल शनिवारी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीचे उद्घाटन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे उद्घाटनानंतर सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होत तिरंगा बाईक रॅलीत सहभाग नोंदविला.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती अभिमानाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे या रॅलीचे आयोजन केले होते. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे ही रॅली लक्षवेधक ठरली.

रॅलीच्या प्रारंभी सहपालकमंत्री जयस्वाल, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी स्वतः मोटरसायकलवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतला. सहपालकमंत्र्यांच्या या सहभागामुळे उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. सोबत आ.डॉ.मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक एम.रमेश तसेच जिल्हा पोलीस दलातील सुमारे 300 हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

तिरंगा हाती घेतलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलींची रांग आणि त्यात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यामुळे संपूर्ण रॅली देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेली. पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच विविध राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यही करत असते. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या तिरंगा बाईक रॅलीत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलीस दलाने एकत्रित सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.