Home दैनंदिन बातम्या एटापल्ली तालुक्यातही वाघाची दहशत, हल्ल्यात शेतकरी ठार

एटापल्ली तालुक्यातही वाघाची दहशत, हल्ल्यात शेतकरी ठार

घराजवळच्या जंगलात नेले फरफटत

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील दोलंदा गावातील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करत त्यांना ठार केले.
हरी बोहरण वड्डे (57 वर्ष) असे मृताचे नाव आहे. ते घराबाहेरील जंगलात शौचास गेले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वनविभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार वाघानेच त्यांच्यावर हल्ला करून फरफटत जंगलात नेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वाघाने हल्ला करण्याची या भागातील अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे लगतच्या परिसरात दहशत पसरली आहे.

तालुक्यातील जारावंडी परिसरात काही दिवसांपासून अनेकांना वाघाची झलक दिसली होती. पण आतापर्यंत कोणावर हल्ला झाला नसल्यामुळे नागरिक दहशतीत नव्हते. पण रविवारी सकाळी हरी वड्डे घराबाहेरच्या जंगलात शौचास गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांनी शोध घेतला असता जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला.

वनविभागाने पंचनामा करत हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जंगल परिसरात वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे श्वापदं गावाकडे येत असल्याचे बोलले जात आहे.