गडचिरोली : जपतलाईमधील सर्पदंशाच्या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या आदिवासी विकास विभागाने पूर्व विदर्भातील सर्व खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील सोयीसुविधांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही तपासणी वस्तुनिष्ठ व्हावी यासाठी एका जिल्ह्यातील शाळांची तपासणी दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत करण्याचा आदेश अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी दिला आहे. दरम्यान नागपूरच्या राज्यसभा खासदार माया इवनाते यांनी बुधवारी (दि.19) जपतलाई शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला.
अनुदानित आश्रमशाळांच्या तपासणी मोहिमेत कोणत्या शाळेत कोणत्या गोष्टींची कमतरता आहे हे तपासले जाणार आहे. शाळांच्या वसतिगृहात झोपण्यासाठी किती पलंगांची कमतरता आहे अशा सर्व मुद्द्यांची तपासणी 21 अॅागस्टपर्यंत केली जाणार आहे.
खासदार इवनाते यांनी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि घटनेमागील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी सर्वप्रथम सर्पदंशाच्या घटनेत मृत्यू झालेल्या सुस्मिता मंडल, दीपिका लकडा, अनु कोरेटी या तिन्ही विद्यार्थिनींच्या पालकांची भेट घेतली. मुलींच्या मृत्यूने कुटुंबीयांवर ओढवलेल्या दुःखाची तीव्रता समजून घेत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. त्यानंतर धानोरा येथील विश्रामगृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन आश्रमशाळेतील परिस्थिती, विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवास व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी
खासदार माया इवनाते यांनी जपतलाई येथील आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांचे निवासस्थान, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि उपलब्ध मूलभूत सुविधांची पाहणी केली. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेतील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी परिसरातील सापांचा धोका, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, रात्रीच्या वेळी देखरेख, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्था याबाबतही चर्चा केली.
ग्रामस्थांशी संवाद साधून जाणून घेतली वस्तुस्थिती
आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर खासदार इवनाते यांनी स्थानिक ग्रामस्थांशीही संवाद साधला. 9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या घटनेची पार्श्वभूमी, आश्रमशाळेतील परिस्थिती आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेतली. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबतही ग्रामस्थांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
जपतलाईची आश्रमशाळा 20 वर्षांपासून सेवेत
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे 233 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. खासदार माया इवनाते यांच्या या भेटीत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन, अधिकाऱ्यांशी चर्चा, आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी आणि ग्रामस्थांकडून वस्तुस्थिती जाणून घेणे, अशा विविध स्तरांवरून घटनेचा आढावा घेण्यात आला. आता या पाहणीनंतर प्रशासनाकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जातात याकडे पालक, ग्रामस्थ आणि संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
































