भामरागड : वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भामरागड तालुक्यातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी वनविभागाच्या वतीने 19 लाख 25 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी सदर मदतीचा लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. मुख्य वनसंरक्षक जी.पी.नरवणे , उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहाय्यक वनसंरक्षक आकर्ष बासापुरा व दीपक रामटेके यांच्या मार्गदर्शनात हे मदतकार्य करण्यात आले.
श्वापदांच्या हल्ल्यात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या 12 नागरिकांना यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 19 लाख 25 हजार रुपयांच्या शासकीय नुकसानभरपाई धनादेशांचे (चेक) वाटप करण्यात आले.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
यावेळी बोलताना आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी शासन आणि वनविभाग कटिबद्ध आहे. बाधित कुटुंबांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.
वनविभागाचे आवाहन
वनपरिक्षेत्र अधिकारी अमर हणमंत भिसे व योगेश शेरेकर यांनी नागरिकांना जंगलालगतच्या भागात शेतीकाम करताना खबरदारी घेण्याचे, रात्रीच्या वेळी एकटे न फिरण्याचे आणि वन्यप्राणी आढळल्यास तातडीने वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन केले.
धनादेश वितरण कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, तहसीलदार किशोर बागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर भिसे व योगेश शेरेकर, मुख्य अधिकारी अभिजीत सोनवणे, वनपाल महेश खोब्रागडे, वनरक्षक माधुरी तलांडे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच, उपसरपंच, बाधित शेतकरी, नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































