Home क्राईम शेतात लावलेल्या हातभट्ट्यांवर धाडी, सडव्यासह 5.40 लाखांचा माल नष्ट

शेतात लावलेल्या हातभट्ट्यांवर धाडी, सडव्यासह 5.40 लाखांचा माल नष्ट

चार आरोपींवर गुन्हा दाखल

गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूला आळा घालण्यासाठी अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राच्या पथकाने मौजा नवेगाव व वेलगुर टोला शेतशिवारात चार विविध ठिकाणी धाडी टाकून अवैधपणे मोहफुलाच्या दारूची हातभट्टी चालविणा­ऱ्या, तसेच साठवणूक करुन विक्री करणाऱ्या 4 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत मोहफुलाच्या सडव्यासह हातभट्टीची दारू मिळून 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

येलचिलच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. यात मारोती लक्ष्मण मोहुर्ले (35 वर्ष), रा.नवेगाव ता.अहेरी, शंकर नागोराव सोनुले (38 वर्ष) रा.नवेगाव ता.अहेरी, शंकर बिच्चु आत्राम (24 वर्ष), रा.नवेगाव ता.अहेरी, तिरुपती कनकय्या दुलम (40 वर्ष), रा.वेलगुर ता.अहेरी हे शेतशिवारात वेगवेगळ्या ठिकाणी मोहफुलाच्या सडव्याची साठवणूक करुन मोहफुलाची दारु अवैधरित्या तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने मौजा नवेगाव व वेलगुर टोला येथील शेतीच्या परिसरात पाहणी केली असता, चार विविध अवैध हातभट्ट्या मिळून आल्या.

या कारवाईत एकूण 44 निळ्या रंगाच्या ड्रममध्ये 5,400 लिटर मोहफुल सडवा (एकूण किंमत 5,40,000 रुपये) मिळून आला. हातभट्टी साहित्य, तयार हातभट्टी दारु व प्लास्टिक ड्रममधील मोहफुलाचा सडवा नियमानुसार घटनास्थळावरच नष्ट करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलीस अधिकारी (अहेरी) हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें येलचिलचे प्रभारी अधिकारी पोउपनि.धनाजी शिंदे, पोउपनि.अशोक बांगर आणि अंमलदारांनी पार पाडली.