Home दैनंदिन बातम्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गडचिरोलीच्या नेतेमंडळींची भेट

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गडचिरोलीच्या नेतेमंडळींची भेट

मंत्री उईके यांच्याकडे मांडल्या मागण्या

आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करताना भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी

गडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्या, अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ यांच्या वतीने नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर दि.13 ऑगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाला काल (दि.21) माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

यावेळी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, देवरीचे आमदार संजय पुराम यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी विद्यार्थी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश इरपाची यांच्यासह अनेक आदिवासी पदाधिकारी व विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. भरपावसातही विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलनस्थळी ठामपणे बसले असून, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

माजी खासदार डॉ.अशोकजी नेते यांनी आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देताना ते म्हणाले की, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. या विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आम्ही आलो आहोत.” असे नेते यांनी स्पष्ट केले.

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता त्यांच्या भविष्यासाठी संवेदनशीलतेने विचार करून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, आंदोलनस्थळी भेटीनंतर रविभवन येथे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत चर्चात्मक बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे व त्यांच्या समस्या जाणून घेत, मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी चर्चा केली.