
गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडी आणि जबरी चोरीच्या 2 गुन्ह्रांमध्ये चोरीला गेलेले 11 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांकडून परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तक्रारकर्त्यांना ते पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, दि. 27 एप्रिल 2026 रोजी शहरातील रामनगरातील एक महिला त्यांच्या नातेवाईकांकडे एसटी बसने जात असताना प्रवासादरम्यान चोरट्यांनी त्यांच्याकडील 58.5 ग्रॅम वजनाचे (किंमत 8,62,500 रुपये) सोन्याचे दागिने लंपास केले होते. गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करून चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने आरोपीकडून हस्तगत केले होते.
तसेच दि. 16 मार्च 2026 रोजी आमिर्झा येथील सोने-चांदीच्या दुकानात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश करुन चोरी केली होती. या गुन्ह्यात सोन्या-चांदीचे विविध दागिने मिळून 2,33,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे विविध दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सदर तपासादरम्यान एकूण 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. न्यायालयाकडून सदरचे जप्त मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.21) फिर्यादींना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून एकूण 10 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या हस्ते फिर्यांदी यांना सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेले सोने-चांदीचे दागिने पुन्हा आपल्या हाती मिळाल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त करून गडचिरोली पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल आभार व्यक्त केले.
सदर कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि.कृष्णा सोनुले, पोउपनि.अतुल तराळे व अंमलदार यांनी पार पाडली.
































